ग्रामीण आरोग्य यंत्रणा सुसज्ज करा पालकमंत्री यशोमती ठाकूर

, ऑक्सिजन प्रणाली, आवश्यक मनुष्यबळाची तरतूद

ग्रामीण आरोग्य यंत्रणा सुसज्ज करा

 पालकमंत्री यशोमती ठाकूर


अमरावती, दि. ४ : कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता ग्रामीण आरोग्य यंत्रणा सुसज्ज करावी. उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांना व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजन प्रणाली व आवश्यक प्रशिक्षित मनुष्यबळ आदी कार्यवाही गतीने पूर्ण करण्याचे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले.

 

कोरोना प्रतिबंध उपाययोजनेचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. आमदार सुलभाताई खोडके, आमदार बळवंतराव वानखडे, आमदार प्रताप अडसड, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलूभाऊ देशमुख, माजी आमदार वीरेंद्र जगताप, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, पोलीस आयुक्त आरती सिंह, पोलीस अधीक्षक हरी बालाजी, मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यांत पंडा, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, डॉ. दिलीप रणमले, डॉ. अनिल रोहणकर यांच्यासह आरोग्य यंत्रणा, डॉक्टर आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, कोरोना रोखण्यासाठी गत एका वर्षात विविध स्तरावर उपचार यंत्रणा निर्माण करण्यात आली. दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात बाधितांची संख्या वाढली. त्यामुळे तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता ग्रामीण यंत्रणा अधिक सक्षम होणे गरजेचे आहे. त्यासाठी उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयात व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजन प्रणाली, आवश्यक मनुष्यबळाचे अचूक नियोजन करून ते उपलब्ध करून घ्यावे. कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण वेळेत पूर्ण करावे. तालुका रुग्णालयाच्या ठिकाणी ऑक्सिजन जनरेशनचे नियोजन आहे. त्यादृष्टीने प्रयत्न व्हावेत, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.

संभाव्य लाटेचा लहान मुलांना धोका असण्याची शक्यता लक्षात घेता प्रत्येक उपजिल्हा रुग्णालयात बालकांसाठी १० व तालुका रुग्णालयात ५ खाटा राखीव असणे आवश्यक आहे.
या पार्श्वभूमीवर लसीकरण कार्यक्रम नियोजनपूर्वक राबवावा. लस उपलब्धतेबाबत गावात सरपंच, पोलीस पाटील यांना माहिती असणे आवश्यक आहे. मेळघाटात लसीकरण वाढवावे, असेही निर्देश त्यांनी दिले.

सध्या रुग्णसंख्या कमी झाली असली तरी तिसरी लाट थोपवून धरण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने प्रयत्न करावे. नागरीकांनीही दक्षता पाळून साथ नियंत्रणासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी यावेळी केले.

Previous Post Next Post
MahaClickNews