भारतीय अन्न महामंडळाचे विभागीय कार्यालय अमरावतीत कार्यान्वित

अमरावती, दि. 1 : भारतीय अन्न महामंडळाचे पश्चिम विदर्भातील कामकाज सुलभ करण्यासाठी भारतीय अन्न महामंडळ (एफसीआय) चे विभागीय कार्यालय अमरावती येथे कार्यान्वित करण्यात आले आहे.

कोरोना साथीमुळे अत्यंत मोजक्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. मंडळाचे प्रबंधक नरेंद्र कुमार तसेच सहाय्यक महाप्रबंधक डी. आर. पासवान यांच्या हस्ते कार्यालयाचा शुभारंभ झाला. हे कार्यालय शहरातील मुख्य टपाल कार्यालयासमोरील दूरसंचार भवनाच्या तिस-या माळ्यावर कार्यान्वित झाले असून, कामकाजाला सुरुवात करण्यात आली.

राष्ट्रीय खाद्य सुरक्षा अधिनियम अंतर्गत देशातील जनतेची अन्नसुरक्षा सुनिश्चित करण्यात भारतीय अन्न महामंडळाची महत्त्वाची भूमिका आहे. शेतकऱ्यांकडून शेतीमाल खरेदी करण्यासंबंधी एफसीआय एक विश्वासार्य सरकारी संस्था म्हणून काम करीत आहे. अमरावती येथे भारतीय अन्न महामंडळाचे विभागीय कार्यालय सुरु झाल्याने याचा फायदा पश्चिम विदर्भातील शेतकरी यांच्यासह सहकारी संस्था, अन्न सुरक्षा कायदाचे लाभार्थी, स्वयंसेवी संस्था आदींना होणार आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रिय अन्न व सार्वजनिक वितरण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केली आहे.

कोविड-19 च्या काळात निरंतर खाद्य पुरवठा करून मंडळाने कार्यक्षमतेने जबाबदारी पार पाडली आहे. पश्चिम विदर्भातील साठवण क्षमता, व्यवस्थापन, सार्वजनिक वितरण प्रणालीचे नियोजन आणि सुधारित सुधारित संरचनेनुसार खाद्यान्न खरेदी विभागीय कार्यालयामार्फत केली जाणार आहे. विभागीय कार्यालय अमरावती येथे कार्यान्वित झाल्यामुळे काम कार्यक्षमपणे व जलद गतीने होतील तसेच पश्चिम विदर्भातील संबंधित सरकारी संस्था तसेच इतर संस्थांना कार्यालयाशी संपर्क साधणे सोयीस्कर होणार आहे.
Previous Post Next Post
MahaClickNews