जिल्ह्यात विकासकामांसाठी सुमारे 120 कोटींचा निधी _इमारती, रस्ते व पुलाच्या कामांना मिळणार गती _पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

जिल्ह्यात विविध पायाभूत सुविधांसाठी शासनाकडून भरीव तरतूद
इमारती, रस्ते व पुलाच्या कामांना मिळणार गती
पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर
जिल्ह्यात विकासकामांसाठी सुमारे 120 कोटींचा निधी

अमरावती, दि. १० : जिल्ह्यातील रस्ते, पूल, महत्वाच्या इमारतींचे बांधकाम व दुरुस्त्यांसाठी राज्य शासनाकडून अर्थसंकल्पाद्वारे मोठी तरतूद करण्यात आली असून, वित्त विभागाद्वारे पूरक मागण्यांना मान्यता मिळून निधी उपलब्ध करून दिला जात आहे. जिल्ह्यातील विविध पायाभूत सुविधांसाठी सुमारे 120 कोटी रूपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे इमारती, अनेक रस्ते व पुलाची कामे मार्गी लागून विकास गतिमान होणार आहे, असे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी सांगितले.

            जिल्ह्यातील पायाभूत सुविधा, रूग्णालये व इतर शासकीय इमारतींच्या, तसेच रस्त्यांच्या आवश्यक सुधारणा, पूल आदी अपेक्षित कामांबाबत पालकमंत्र्यांनी स्वत: ठिकठिकाणी जाऊन पाहणी केली होती. व ही कामे पूर्णत्वास जाण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला व तसे निवेदनही दिले. त्यानुसार राज्य नियोजनात या रस्त्यांच्या कामांचा समावेश करण्यात आला व त्याप्रमाणे निधीही उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामुळे लवकरच याबाबतची पुढील प्रक्रिया सुरळीत होऊन ही कामे गती घेतील.  

                                    *दळणवळणाच्या सुविधा भक्कम होणार*

 खेड्यापाड्यांना जोडणा-या अनेक महत्वाच्या रस्त्यांच्या सुधारणेची कामे याद्वारे होणार आहेत. रस्त्यांवरील आवश्यक पुलांचेही काम सुरू होणार आहे. यामुळे प्रभावी संपर्कयंत्रणा निर्माण होणार आहे. अनेक तालुक्यांच्या ग्रामीण भागातील नागरिकांसाठी दळणवळणासाठी सुविधा निर्माण होईल. राज्याच्या गतिमान विकासासाठी महाविकास आघाडी शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही पालकमंत्री ॲड. ठाकूर यांनी दिली.

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील नवीन इमारतीच्या बांधकामासाठी, तसेच आस्थापना व इतर यंत्रणेसाठी 3 कोटी 5 लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. जिल्हा योजनेंतर्गत वन्यजीवन संरक्षणासाठी
90 लक्ष, शिक्षण क्रीडा कला संस्कृती शीर्षांतर्गत बांधकामासाठी 60 लक्ष, जिल्हा स्त्री रूग्णालयातील मेडिकल गॅस पाईपलाईन, सोलर हिटर, सीसीटीव्ही आदींसाठी 6 कोटी 45 लक्ष, अचलपूर उपजिल्हा रूग्णालयातील कामांसाठी 1 कोटी 11 लक्ष आदी तरतूद करण्यात आली आहे.   

                                    *रस्त्यांच्या कामांसाठी मोठा निधी*                                 

राज्य महामार्ग 303 बेलोरा काटसूर आडगाव रस्त्याच्या सुधारणेसाठी 1 कोटी 20 लक्ष, पूर्णानगर निरूळ गंगामाई वाकी खोलापूर रस्त्यावर सुधारणा व पुलासाठी 3 कोटी, अडगाव यावली पिंपळविहिर मार्डी कार्ला ते चांदूर रेल्वे या राज्य महामार्ग 303 च्या सुधारणेसाठी दीड कोटी, अडगाव यावली मार्गे माऊली जहाँगीर रस्त्यासाठी 90 लक्ष, यावली डवरगाव मोझरी व-हा रस्त्याच्या सुधारणेसाठी साडेचार कोटी, बहिरम- सर्फापूर- चांदूर बाजार राज्य महामार्गच्या 303 च्या सुधारणेसाठी चार कोटी, ब्राम्हणवाडा थडी घाटलाडकी आष्टगाव रस्त्यावर चारगड नदीवर मोठ्या पुलाच्या पोचमार्गाच्या बांधकामासाठी 2 कोटी 25 लाख, बामणी बल्लारपूर यवतमाळ अमरावती अचलपूर हरिसाल धारणी ब-हाणपूर रस्त्याचे डांबरीकरण व नूतनीकरणासाठी 7 कोटी, किनखेड दहिहंडा दर्यापूर रस्त्यासाठी 4 कोटी 70 लक्ष, मार्डी कार्ला चांदूर रेल्वे रस्त्यासाठी 4 कोटी, तिवसाघाट शे. घाट पुसला गणेशपूर मोवाड रस्ता सुधारणा व पूल बांधकामासाठी 2 कोटी, अंजनगाव परतवाडा बैतुल 24 किमी चौपदरीकरणसाठी 1 कोटी 34 लाख, अंजनगाव काकडा रा. मा. रुंदीकरणासह सुधारणेसाठी 4 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. बामणी चंद्रपूर यवतमाळ अमरावती चिखलदरा खांडवा रस्त्याच्या सुधारणेसाठी 7 कोटी, धारणी ढाकणा बिजूधावडी शेलू खटकाळी पांढरा खडक चिंचोना चौसाळा रस्त्यासाठी 4 कोटी, तळवेल साऊर, तरारखेडा, आष्टी, वायगाव खारतळेगाव रस्त्याच्या सुधारणेसाठी दीड कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.

                                                *तीर्थक्षेत्रांना जोडणा-या रस्त्यांची सुधारणा*

त्याचप्रमाणे, कौंडण्यपूर तीर्थक्षेत्राशी जोडणा-या कु-हा कौंडण्यपूर ते जिल्हा सीमा रस्त्याच्या सुधारणेसाठी चार कोटी रुपये, रिद्धपूर तीर्थक्षेत्राशी जोडणा-या अमरावती कठोरा पुसदा चांदूर बाजार रस्त्याची सुधारणा करण्यासाठी 7 कोटी 67 लक्ष, अमरावती चांदूर रेल्वे धामणगाव रस्त्यासाठी 4 कोटी 73 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विरशी वायगाव रस्ता सुधारणा व छोट्या पुलासाठी 2 कोटी, रिद्धपूर- बेलोरा- चिंचोली काळे – देवरी- कठोरा- नांदगावपेठ रस्त्याच्या सुधारणा व पुलासाठी 4 कोटी, टाकरखेडा पुसदा रोहणखेडा माऊली जहाँगीर रस्ता सुधारणा व पुलासाठी 4 कोटी, अंजनगाव दर्यापूर मूर्तिजापूर रस्त्यासाठी 4 कोटी 73 लक्ष,  उदखेड खोपडा शिरखेड रस्ता सुधारणेसाठी 6 कोटी 25 लक्ष, निंभोरा गणोजादेवी ते जिल्हा सीमेपर्यंत रस्त्यांसाठी 5 कोटी, रिद्धपूर, तिवसा धामणगाव देवगाव रस्त्यासाठीही सुमारे दहा कोटी निधीची तरतूद आहे.


Previous Post Next Post
MahaClickNews