यवतमाळ - बडनेरा व अमरावती - परतवाडा रस्त्याची कामे हायब्रिड ॲन्युईटी योजनेतून करणार सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण

_अमरावती जिल्ह्यातील रस्त्यांबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण बैठक_
_अमरावतीच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांची उपस्थिती_

 
यवतमाळ - बडनेरा व अमरावती - परतवाडा रस्त्याची कामे हायब्रिड ॲन्युईटी योजनेतून करणार

- सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण 


मुंबई, दि. १ : महाराष्ट्र रस्ते सुधारणा प्रकल्पाअंतर्गत अमरावती जिल्ह्यातील यवतमाळ ते बडनेरा आणि अमरावती ते परतवाडा/अचलपूर हे दोन्ही रस्ते वाहतुकीच्या दृष्टीने विदर्भातील महत्त्वाचे आहेत. या रस्त्याची सुधारणांची कामे हायब्रिड ॲन्युईटी अंतर्गत घेण्यास आज सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी तत्वतः मान्यता दिली आहे. यासंबंधीचा प्रस्ताव पाठविण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

अमरावती जिल्ह्यातील विविध रस्ते विकास कामांच्या बाबतीत अमरावतीच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्याकडून शासन स्तरावर सतत पाठपुरावा होत आहे. त्यानुसार आज श्री. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली व अमरावतीच्या पालकमंत्री तथा महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी आमदार बळवंतराव वानखेडे, राजेश एकडे, देवेंद्र भुयार हे प्रत्यक्ष तर माजी आमदार वीरेंद्र जगताप हे दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. सचिव (बांधकामे) उल्हास देबडवार, मुख्य अभियंता प्रकाश इंगोले तसेच अमरावती विभागाचे मुख्य अभियंता प्र.द. नवघरे, कार्यकारी अभियंता अरुंधती शर्मा आदी उपस्थित होते.

            सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. चव्हाण म्हणाले की, यवतमाळ ते बडनेरा आणि अमरावती ते परतवाडा/अचलपूर या दोन्ही रस्त्यांची कामे हायब्रिड ॲन्युइटी योजनेतून घेण्यासंदर्भात प्रस्ताव पाठवावे. तसेच वलगाव- दर्यापूर- अंजनगाव या रस्त्याचे व दर्यापूर-गणेशवाडी-आमला-अंजनगाव या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी योग्य ती कार्यवाही करावी.  गव्हाणपूर रस्त्याच्या कामासंदर्भात मुख्य अभियंत्यांनी पाहणी करावी, असेही निर्देश त्यांनी दिले.

श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, अमरावती विभागातील बामणी चंद्रपूर-यवतमाळ-बडनेरा-अमरावती-परतवाडा-धारणी-बऱ्हाणपूर या मार्गावरील यवतमाळ ते बडनेरा आणि अमरावती ते परतवाडा रस्त्यांची स्थिती चांगली नाही. हा रस्ता दोन जिल्ह्यांना जोडणारा तसेच मध्यप्रदेश व राजस्थान या राज्यांनाही जोडणारा असल्याने मोठी वाहतूक होते. त्यामुळे या रस्त्याची चौपदरीकरण करून दुरुस्ती करण्यात यावे. तसेच अमरावती वरूड –गव्हाणपूर रस्त्याचे कामही व्यवस्थित झाले नाही. त्यावर कार्यवाही करावी, अशी मागणी श्रीमती ठाकूर यांनी केली.

यावेळी आमदार बळवंतराव वानखेडे, देवेंद्र भुयार, माजी आमदार वीरेंद्र जगताप, राजेश एकडे यांनी मतदारसंघातील रस्त्यांच्या कामांसंदर्भात निधी देण्याची मागणी केली.
Previous Post Next Post
MahaClickNews