पालकमंत्र्यांकडून कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा तिसरी लाट रोखण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न आवश्यक- पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

अमरावती, दि. २४ :  कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली तरी गाफील राहून चालणार नाही. तिसरी लाट रोखण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करावेत, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज दिले.


जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या.
आमदार बळवंतराव वानखडे, जिल्हाधिकारी पवनीत कौर, मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यांत पंडा, पोलीस आयुक्त आरती सिंह, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, सहायक जिल्हाधिकारी मंदार पत्की, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, अपर पोलीस अधीक्षक श्याम घुगे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, दुसरी लाट ओसरत असताना ज्या भागात कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत तिथे नियंत्रण मिळवणे गरजेचे असून तिसरी लाट थोपविण्यासाठी वेगाने लसीकरण होणे महत्वाचे आहे.
 अठरा वर्षे आणि पंचेचाळीस वर्षे वयोगटातील नागरिकांना लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण करण्यासाठी नियोजन करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

ग्रामीण आणि शहरी रुग्णालयात बेड,ऑक्सिजनचा पुरवठा करणारी यंत्रणा तत्पर असावी.
चांदुर बाजार, दर्यापूर, धरणी, तिवसा,  नांदगाव ,अंजनगाव सुर्जी, चिखलदरा, चुरणी येथे लवकरात लवकर खाटा व उपचार सुविधा वाढविण्यात याव्यात असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. येत्या पंधरवड्यात सर्व ठिकाणी सुसज्ज यंत्रणा उभारण्याचे निर्देश त्यांनी दिले. आरोग्य सेवा पुरविण्यासाठी देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणाबाबत माहितीही त्यांनी घेतली.
Previous Post Next Post
MahaClickNews