भिवापूर, बोर्डा, वणी ममदापुर येथील आरोग्य उपकेंद्राचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन_ गोरगरीब व गरजू रुग्णांसाठी ग्रामीण आरोग्य यंत्रणेचे बळकटीकरण पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

_पावणेसात कोटी रुपये निधीतून आरोग्य उपकेंद्रे, रस्ते, विश्रामगृह विस्तारीकरण_
भिवापूर, बोर्डा, वणी ममदापुर येथील आरोग्य उपकेंद्राचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन

गोरगरीब व गरजू रुग्णांसाठी ग्रामीण आरोग्य यंत्रणेचे बळकटीकरण
पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

अमरावती, दि. १ : _जिल्ह्यात ठिकठिकाणी आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, रुग्णालयांचे श्रेणीवर्धन अशी अनेक कामे आकारास येत आहेत. त्यामुळे ग्रामीण आरोग्य यंत्रणेचे बळकटीकरण होऊन  गोरगरीब व गरजू रुग्णांना उत्तम दर्जाची उपचार सुविधा निर्माण होईल, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी विविध आरोग्य उपकेंद्रांच्या शुभारंभप्रसंगी केले._


भिवापूर, बोर्डा, वणी ममदापुर या तीन ठिकाणी आरोग्य उपकेंद्राचे, तसेच आखतवाडा येथील काँक्रीट रस्त्याचे भूमीपूजन, तसेच मोझरी व तिवसा येथील शासकीय विश्रामगृहाच्या विस्तारीकरणाचा शुभारंभ आज पालकमंत्र्यांच्या हस्ते झाला. भिवापूर व बोर्डा उपकेंद्रासाठी प्रत्येकी ७५ लाख, वणी ममदापुर उपकेंद्र व इतर विकासकामांसाठी १ कोटी, आखतवाड्यात रस्त्यासाठी १० लक्ष, तिवसा व मोझरी शासकीय विश्रामगृहाच्या विस्तारीकरणासाठी प्रत्येकी २ कोटी अशी सुमारे पावणेसात कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.  जि. प. सभापती पूजाताई आमले, पं.स. सभापती शिल्पाताई हांडे, पं.स. सदस्य अब्दुल सत्तार, भिवापूरचे सरपंच भारत जाधव, बोर्डा येथील सरपंच अतुल राऊत, वणी ममदापुरचे सरपंच मुकुंदराव पुनसे, वासुदेव महाराज, प्रल्हादराव चव्हाण, तहसीलदार वैभव फरतारे, गटविकास अधिकारी चेतन जाधव आदी यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, कोरोना महामारीच्या काळात मोठे नुकसान झाले. अनेक अडचणी आल्या. आता तिसरी लाट येऊ नये अशी प्रार्थना करूया. ही संभाव्य लाट रोखण्यासाठी सर्वंकष प्रयत्न होत आहेत. याच काळात आरोग्य सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी विविध ठिकाणी आरोग्य केंद्रांची निर्मिती, श्रेणीवर्धन, अनेक सोयीसुविधांची उभारणी होत आहे. त्याचप्रमाणे, गावांमध्ये आवश्यकतेनुसार स्मशानभूमी, शेड आदी कामेही पूर्ण करण्यात येतील. उपकेंद्राचे काम गुणवत्तापूर्ण व विहित वेळेत पूर्ण करावे, असे निर्देशही त्यांनी दिले. 

*पुढील काळातही अनेक कामांचे नियोजन*

अनेक कामे पूर्ण झाली, अनेक सुरू आहेत. पुढेही अनेक कामांचे नियोजन आहे. त्यामुळे थांबून चालणार नाही.
' _अभी तो नापी है जमी मुठ्ठीभर, अभी तो आसमां बाकी है_' अशा शब्दांत पालकमंत्र्यांनी विविध कामांतून विकासाला गती देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला.

आरोग्य उपकेंद्रासाठी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या प्रयत्नाने वाढीव निधी मिळाला. त्याशिवाय, त्यांनी स्वतःच्या स्थानिक विकास तरतुदीतूनही निधी मिळवून दिला. त्यामुळे सुसज्ज व्यवस्थेसह  उपकेंद्रे साकारणार आहेत, असे भिवापूरचे सरपंच श्री. जाधव यांनी सांगितले.

पालकमंत्र्यांकडून ग्रामीण आरोग्य यंत्रणेची पाहणी

मार्डी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचीही पाहणी पालकमंत्र्यांनी आज केली. रुग्णालयात पुरेसा औषध साठा असावा. नागरिकांना वेळीच औषधे उपलब्ध करून द्यावीत. सेवेबाबत तक्रारी येता कामा नये, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले. यावेळी त्यांनी रुग्णांशीही संवाद साधून त्यांची विचारपूस केली.
Previous Post Next Post
MahaClickNews