अनाथ बालकांच्या मदतीसाठी आता 'मिशन वात्सल्य' -पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

अनाथ बालकांच्या मदतीसाठी आता 'मिशन वात्सल्य'

पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

जिल्हा प्रशासन आणि महिला व बालविकास कार्यालयाचा उपक्रम

अमरावती, दि. 8 : अनाथ बालकांसाठी संगोपन योजना राबवितानाच त्यांना सामाजिक व आर्थिक सहकार्यासह भविष्यातील शिक्षण प्रवेश, स्थावर मालमत्ता नावाने करणे, बँक खाते, आधार कार्ड किंवा इतर प्रमाणपत्रे आदी विविध बाबींसाठी मार्गदर्शन व सहकार्य आवश्यक असते. हे लक्षात घेऊन त्यांना सर्व कागदपत्रे एकाच छताखाली एकत्रितरीत्या मिळवून देण्यासाठी वात्सल्य हा अभिनव उपक्रम प्रशासन आणि महिला बालविकास विभागातर्फे अमरावती जिल्ह्यात हाती घेण्यात आला आहे, असे महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज  सांगितले.

            कोरोना साथीमुळे पालक गमावलेल्या बालकांसाठी संगोपन योजना राबविण्यात येत आहे. आईवडील गेल्यावर बालकांवर मोठा मानसिक आघात  होतो. त्यांना आधार देण्याकरिता अनेक हात समोर येतात. शासन दरबारी त्यांना सहकार्य मिळते. मात्र, सामाजिक व आर्थिक सहकार्याबरोबरच त्यांना भविष्यात लागणारी सर्व कागदपत्रे मिळवून देणे गरजेचे आहे. विविध योजनांचा लाभ या बालकांना मिळवून देताना आवश्यक कागदपत्रेही उपलब्ध करून द्यावीत, असे आदेश महिला व बालविकास मंत्री ॲड. ठाकूर यांनी दिले होते. त्यानुसार जिल्हा प्रशासनाकडून कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

कुठल्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी काही प्रमाणपत्राची गरज असते. याप्रकारची जवळजवळ 18 प्रमाणपत्रे असतात. पालक गेल्याने पाल्यांना अथवा कुटुंबाला या गोष्टीची अनेकदा जाणीव नसते. शिक्षण प्रवेश, स्थावर मालमत्ता नावाने करणे, बँक खाते , आधार कार्ड किंवा इतर प्रमाणपत्रे पाल्यांसाठी आवश्यक असतात. त्यामुळे गरजू पाल्यांना ही कागदपत्रे मिळवून देण्यासाठी वात्सल्य हा उपक्रमाची आखणी पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी याबाबत सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका शिक्षण अधिकारी, विधी सेवा प्राधिकरण, बालविकास प्रकल्प अधिकारी यांची समिती गठित करून त्यांच्यावर विविध जबाबदा-या सोपविणारे आदेश निर्गमित केले. महिला व बालविकास अधिकारी अतुल भडांगे हे समितीचे सदस्य आहेत.

कोरोना संक्रमणामुळे मृत पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील व्यक्तींना व अनाथ बालकांना आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देणे, त्या कागदपत्रांनुसार शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देणे अशा कार्यवाहीला सुरुवात झाली आहे.

                                    एकाच छताखाली सगळी कागदपत्रे

या उपक्रमासाठी तालुका स्तरावर टीम निर्माण करण्यात येत आहेत. मुलांना सर्व प्रकारचे प्रमाणपत्र एका छत्राखाली मिळणार आहेत. सर्व प्रमाणपत्राची फाईल निर्माण करून ती पाल्यांना सुपुर्द करण्यात येईल. 
Previous Post Next Post
MahaClickNews