संत गाडगे बाबा यांची १५० वी जयंती राष्ट्रीय पातळीवर साजरी व्हावी - महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर

मुंबई, दि. ८ : थोर समाजसुधारक संत गाडगे बाबा यांची १५० वी जयंती राज्यात शासकीय यंत्रणेमार्फत साजरी व्हावी, तसेच राष्ट्रीय पातळीवरही साजरी व्हावी, यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे श्री गाडगेबाबा मिशनच्या अध्यक्ष तथा महिला व बालविकास मंत्री  यशोमती ठाकूर यांनी सांगितले.

 मंत्री यशोमती ठाकूर यांनी नुकतेच श्री गाडगे बाबा मिशन मुंबईच्या अध्यक्षपदाची सुत्र हाती घेतली आहेत. अध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर मंत्री महोदयांनी मिशनच्या कार्यकारिणी सभेला  उपस्थिती लावली. यावेळी त्या बोलत होत्या.
 संत गाडगे बाबा यांची २०२६ मध्ये येणारी १५०वी जयंती राष्ट्रीय पातळीवर साजरी व्हावी यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, तसेच राज्यात शासकीय यंत्रणेमार्फत जयंती साजरी करण्यात येईल. त्यासाठी आवश्यक पाठपुरावा आपण करू, असे त्यांनी यावेळी सांगितले.
संत गाडगेबाबांची तत्वे तसेच विचार सर्वत्र पोहचविण्यासाठी सदैव तत्पर असल्याची भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.   संत गाडगे बाबा यांचे विचार समाजात सर्वत्र पोहोचवण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. अत्यंत साध्या पद्धतीने राहणाऱ्या संत गाडगे बाबा यांनी आपल्या कृतीमधून समाजसेवा काय असते, वैज्ञानिक दृष्टीकोन काय असतो, अंधश्रद्धेने कसे नुकसान होते याबाबत जीवनभर जनजागृती केली.  संत गाडगे बाबा यांनी केलेल्या कार्यामधून प्रेरणा घेऊन आपण सगळ्यांनीच त्यांचे विचार आत्मसात करणे आणि ते इतरांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहनही मंत्री श्रीमती ठाकूर यांनी केले.

संत गाडगे बाबा मिशन मुंबईच्या नवी मुंबईतील वाशी येथील प्रशासकीय कार्यालयात ही सभा पार पडली.
Previous Post Next Post
MahaClickNews