इफ्कोटोकियो जनरल इन्शुरन्स कंपनीवर गुन्हा दाखल शेतकरी बांधवांनी नुकसानीबाबत तत्काळ माहिती कळवावी_ जिल्हाधिकारी पवनीत कौर

, दि. २८ : राज्य शासनाने केलेल्या करारानुसार इफ्कोटोकियो जनरल इन्शुरन्स कंपनीचे कार्यालय येथे कार्यान्वित नसल्याचे कृषी मंत्र्यांच्या दौ-यात निदर्शनास आले. त्यामुळे या कराराचा भंग झाला असून, कंपनीविरुद्ध जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून येथील गाडगेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कंपनीचा टोल फ्री क्रमांक लागत नाही व कंपनीचे प्रतिनिधी उपलब्ध होत नाहीत, अशी तक्रार कृषी मंत्री दादाजी भुसे यांना अमरावती दौ-यात प्राप्त झाली. त्यानुसार त्यांनी या कंपनीच्या कार्यालयाची प्रत्यक्ष तपासणी केली. जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्यासह इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते. कंपनीचे कार्यालय सुस्थितीत कार्यान्वित न झाल्याचे तपासणीत आढळले. त्यामुळे या कंपनीने खरीप व रब्बी हंगामासाठी शासनासोबत केलेल्या कराराचे उल्लंघन केले असून, याबाबत तक्रार दाखल करण्याचे निर्देश कृषी मंत्र्यांनी यावेळी दिले. त्यानुसार जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे यांनी गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.   

पीक विमा योजनेत जिल्ह्यातील १ लाख ७२ हजार ६५५ शेतकरी सहभागी आहेत. या कंपनीने तत्काळ जिल्हा व तालुका स्तरावर प्रतिनिधी तत्काळ नेमून नुकसानग्रस्तांना पीक विमा मिळवून देण्यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी दिले आहेत.

 पीक विमा योजनेत सहभागी शेतकरी बांधवांनी  नुकसान झाल्यास ७२ तासांच्या माहिती कंपनीला माहिती द्यावी. संपर्कात अडथळे येत असतील तसे कृषी कार्यालय, तहसील कार्यालयाला कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. त्याबाबत सर्व कार्यालयांना सूचना देण्यात आल्या आहेत.
Previous Post Next Post
MahaClickNews