पालकमंत्र्यांच्या हस्ते सामदा येथे जलपूजन

अमरावती, दि. 30 : _दर्यापूर तालुक्यातील सामदा येथील जलप्रकल्पाचे जलपूजन पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते आज झाले.  अतिवृष्टी, महामारीसारखी संकटे दूर होवोत. संपूर्ण जिल्हा  सुखसमृद्ध होवो, अशी प्रार्थना त्यांनी यावेळी केली._

वलगाव- दर्यापूर रस्त्यालगत, तसेच आसेगाव फाटा येथे पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले. आमदार बळवंतराव वानखडे, जि. प. सदस्य बाळासाहेब हिंगणीकर यांच्यासह ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

 

मानवी जीवनात प्राणवायुचे महत्व अनन्यसाधारण आहे. कोरोना संकटकाळाने तर याची प्रखर जाणीव करून दिली. वृक्ष हे प्राणवायू उत्सर्जित करणारे कायम महत्वाचा स्त्रोत आहेत. त्यामुळे प्रत्येकाने एक वृक्ष लावून त्याची जोपासना केली पाहिजे. वृक्षारोपण ही लोकचळवळ होण्यासाठी नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने योगदान द्यावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.

शेताच्या धुऱ्यावर, सार्वजनिक स्थळी, बगिचे, शाळा, कार्यालयाच्या परिसरात, घरातील आवारात वृक्षारोपण करावे. वड, कडुनिंब, पिंपळ, जांभूळ यासारख्या बहुगुणी व दीर्घ आयुष्यमान असणाऱ्या वृक्षांची लागवड करावी. वृक्ष लागवड ही लोकचळवळ व्हावी, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.
Previous Post Next Post
MahaClickNews