गुरुपौर्णिमा विशेषउत्कल नृत्यनीकेतन येथे गुरूपूजन सोहळा संपन्न

अमरावती
गुरूशिष्य परंपरेला, आपल्या भारतीय संस्कृतीमधे आणि त्यातल्यात्यात भारतीय शास्त्रीय कलांच्या क्षेत्रात अनन्यसाधारण महत्व आहे. ज्ञान, विद्या व कलेचा वारसा एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे हस्तांतरित होतांना गुरू व शिष्य दोघांच्याही ठायी कृतज्ञ भाव असतोच, मात्र गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने ती कृतज्ञभावना अजून कृतीतून व्यक्त करण्याची आपली संस्कृती आहे.

गुरुपौर्णिमेनिमित्त असाच कृतज्ञता सोहळा, अमरावती येथील ओडिसी नृत्यांगना अॅड शीतल मेटकर यांचेद्वारा संचालित ओडिसीनृत्य संस्था, 'उत्कल नृत्यनिकेतन' येथे दरवर्षीप्रमाणे उत्साहात संपन्न झाला.  

या प्रसंगी उत्कलच्या जुन्या नवीन विद्यार्थिनी, त्यांना नृत्याचे धडे देणार्‍या शीतल मेटकर, शीतल यांचे गुरूवर्य डॉ मोहन बोडे, व मोहन बोडे यांचे स्व. गुरू पद्मविभूषण केलूचरण महापात्रा यांची प्रतिमा, असा ओडिसीनृत्य प्रवाहातील चार पिढ्यांची श्रृंखला साधण्याचा योग आला. 

परंपरेचं जतन करत गुरू श्री मोहन बोडे यांनी भगवान जगन्नाथाच्या मूर्तीचे व स्वर्गीय गुरू केलूचरण महापात्रा यांच्या प्रतिमेचे पूजन केले, व शीतल यांनी आपल्या चिमुकल्यांना सोबत घेऊन गुरू मोहन बोडे यांचे पूजन केले.

आपल्या गुरूंचा परिचय आपल्या विद्यार्थिनींशी करून देतांना, शीतल यांनी, विद्यार्थिनींना समजेल अशा सोप्या भाषेत, गुरूशिष्य या नात्याचे सांस्कृतिक, सामाजिक व भावनिक महत्व, गुरूजींचा व स्वतःचा या क्षेत्रातील प्रवास, मार्गात आलेले चढ-उतार, नृत्यातून होणारा व्यक्तिगत विकास या बद्दल माहिती दिली.

तसेच मोहन बोडे यांनी शास्त्रीय कलांच्या शिक्षणाचे कालपरत्वे बदलते स्वरूप, गुरूदक्षिणेची पारंपारिक पार्श्वभूमी, शास्त्राचे महत्व विषद केले. तसेच महर्षी वेद व्यास जयंती व ओडिसी नृत्यातील गुरूपरंपरेची माहिती दिली. 

उत्कलच्या नवागत विद्यार्थिंनींनी 'चौक पदन्यास' चे सादरीकरण केले. तत्पश्चात शीतल यांच्या आग्रहास्तव गुरूजींनी आपल्या शिष्येच्या शिष्यांना 'त्रिभंगी' हा प्रकार शिकवून, ओडिसी नृत्यातील नवीन धड्याचा या प्रसंगी श्री गिरवून घेतला केला.

एरवी अखंड चिवचिवणार्या व दंगा करणार्‍या मुली शास्त्रीय कलेच्या सानिध्यात अतिशय प्रगल्भ समजुतदारपणे वागतात याचं जिंवत उदाहरण या प्रसंगी दिसून आलं.

सिद्धी मुरतकर व प्राची यावले या विद्यार्थिनींनी उत्कल परिवार, नृत्य व शीतल मॅडम यांच्याबद्दलच्या भावना स्वयंस्फूर्तीने आपल्या मनोगतातून मांडणे कौतुकास्पद होते.

सपना शर्मा हिने, सुत्रसंचालनाची जबाबदारी मानसी शर्मा यांच्या मार्गदर्शनात समर्थपणेपणे सांभाळली. 

स्वरा राऊत, अनुष्का गावंडे, वैदेही काकडे, इक्षिता वैद्य, आयुशी देशमुख, सखी देशमुख, तनया काकडे, प्रेरणा वानखडे यांनी आयोजनाची सर्व सुत्रे सांभाळलीत.

सई चिमोटे, सौ अंजली चिमोटे, धृती शेंडे, सौ अर्पिता शेंडे, सौ हेमांगी कुळकर्णी, नीता केने, सौ पल्लवी धंदर या अनुभवी विद्यार्थिनी व खामगाव येथिल अॅड राजेश्वरी आळशी, हेंमत नृत्यकला मंदीर येथिल अनुभवी नृत्यांगणा राधिका कुबडे व मयूरी राऊत, यवतमाळ येथील कथक नृत्यांगना भाग्यश्री बानूबाकोडे इत्यादी पाहुणे प्रामुख्याने उपस्थित होते.

गुरू श्री मोहन बोडे यांनी सर्व नृत्योपासकांना आशिर्वाद व शुभेच्छा दिल्यात. आयूषी देशमुख हिने उपस्थित सर्वांचे आभार मानले. अतीशय प्रसन्न व उत्साहपूर्ण वातावरणात उत्कल नृत्यनीकेतन चा गुरुपौर्णिमा सोहळा पार पडला.
Previous Post Next Post
MahaClickNews