अकोट-आकोला डेमो रेल्वे सुरू करण्याची मागणी 15 संस्था संघटनांचे पदाधिकारी यांचे निवेदन

रविंद्र इंगळे (प्रतिनिधी) 
अकोट :  दक्षिण-मध्य रेल्वे अंतर्गत पूर्णा ते अकोला डेमो रेल्वे गाडी सुरू आहे. सदर डेमो रेल्वे गाडी अकोट पर्यंत सुरु करण्यात यावी. जेणेकरून अकोट व परिसरातील अनेक शहर , ग्रामीण भागातील व्यापारी, विद्यार्थी, शेतकरी, सर्वसामान्य नागरिक यांच्यासाठी सोयीचे होईल. त्यामुळे अकोट अकोला डेमो रेल्वे  त्वरित सुरू करावी अशा आशयाचे निवेदन जवळपास 15 संस्था, संघटना, राजकीय पक्षांचे पदाधिकारी आदींनी दक्षिण मध्य रेल्वे चे प्रबंधक यांना अकोला स्टेशन मास्तर यांच्या मार्फत 11ऑगस्ट रोजी दिले आहे. 
पूर्णा- अकोला डेमो गाडी क्रमांक 57582 ही 19 जुलै 2021 पासून सुरू करण्यात आली आहे. सदर डेमो रेल्वे ही जवळपास चार तास अकोला स्थानकावर उभी असते. त्यामुळे डेमो रेल्वे अकोट पर्यंत सुरू केल्यास वेळेचा सदुपयोग होऊन अकोट शहरासह ग्रामीण भागातील तसेच परिसरातील तेल्हारा, परतवाडा, अंजनगाव शिवाय दुर्गम भागातील प्रवाशांना याचा लाभ होईल तसेच व्यापारी विद्यार्थी शेतकरी नागरिक यांना सुद्धा सोयीचे होईल. सध्या अकोट- अकोला रस्ते मार्गाचे काम सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. अकोला येथून पूर्णा पर्यंत रेल्वे सुरू करण्याची मागणी गत अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. भारताच्या स्वातंत्र्य दिना पासून म्हणजेच 15 ऑगस्ट 2021 पासून सध्या पूर्णा ते अकोला सुरू असलेली डेमो रेल्वे  अकोट पर्यंत सुरू करण्याची मागणी निवेदनकर्त्यांनी केली आहे. सदर निवेदन विधी सेवा समिती सामाजिक कार्यकर्ता तथा मानव समाज संस्थेचे सचिव विजय जितकर यांनी दक्षिण-मध्य रेल्वे नांदेड मंडळाचे प्रबंधक यांना अकोला स्टेशन मास्टर यांच्यामार्फत दिले. निवेदनाच्या प्रतीलीपी खासदार तथा माजी केंद्रीय मंत्री संजयभाऊ धोत्रे, जनरल मॅनेजर सिकंदराबाद यांना पाठवण्यात आले आहेत. निवेदनासोबत नगराध्यक्ष हरिनारायण माकोडे, भाजपा उद्योग आघाडी जिल्हाध्यक्ष संतोष झुनझुनवाला, अकोट तालुका सुवर्णकार व सराफ असोसिएशन चे अध्यक्ष दीपक वर्मा, वंचित बहुजन आघाडी चे माजी जिल्हा उपाध्यक्ष समीर पठाण, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष शशांक कासवे, अकोट बार असोसिएशन चे अध्यक्ष अ‍ॅड. गोपाल गुहे, अकोट कंझ्यूमर प्रोडक्स डिस्ट्रीब्यूटरचे अध्यक्ष रमण अग्रवाल, परीस बहुद्देशीय संस्था अध्यक्ष श्रीकांत तळोकार, एल.आय.सी. विमा प्रतिनिधी संघटनेचे अध्यक्ष कमलकिशोर भगत, भारतीय युवा काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ता मिलिंद नितोने, श्री सरस्वती शिक्षण संकुल चे अध्यक्ष अ‍ॅड.मोहन आसरकर, बापूसाहेब आसरकर अल्पसंख्यांक फाउंडेशन, श्री नवयुग वाचनालय अकोट इत्यादी  सामाजिक, राजकिय संस्था संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची उपरोक्त मागणीची निवेदन देण्यात आली आहे.
Previous Post Next Post
MahaClickNews