अमरावती जिल्ह्यातील 6 गावांना सिंचनाचा लाभ होणार - जलसंपदा राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू

अमरावती, दि. ११ : अमरावती जिल्ह्यातील राजुरा बृहत  लघु  पाटबंधारे  योजनेतील चांदुर बाजार तालुक्यातील मौजे राजुरा येथील लघु पाटबंधारे धरणात पाणी आणणे व उजव्या कालव्याद्वारे सिंचन करण्याच्या प्रकल्पासाठीच्या 193 कोटी 81 लाख खर्चाच्या तरतुदीला  आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली असून प्रकल्पाव्दारे अमरावती  जिल्ह्यातील 6 गावांतील एकुण  1 हजार  हे. क्षेत्रात सिंचनाची सुविधा उपलब्ध होणार आहे, अशी माहिती राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी आज दिली._

         सिंचन क्षमता वाढवून कृषी उत्पादकतेत भर पडण्यासाठी विविध सिंचन योजनांना जलसंपदा विभागाकडून चालना देण्यात येत आहे. याच अंतर्गत राजुरा प्रकल्पासाठी राज्यमंत्री श्री. कडू यांनी पाठपुरावा केला. त्यामुळे या क्षेत्रातील शेतकरी बांधवांना एक हजार हेक्टर क्षेत्रावर सिंचनाची सुविधा उपलब्ध होणार असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

           राज्यमंत्री श्री. कडू म्हणाले की, राजुरा बृहत लघू पाटबंधारे हा प्रकल्प राजुरा गावाजवळील राजुरा नाल्यावर प्रस्तावित असून खारपाणपट्टयातील योजना आहे. यामध्ये बेलोरा गावाजवळ काशी नदीवर वळण बंधारा बांधुन त्यातुन फिडर कालव्या व्दारे (पुरवठा कालवा) प्रस्तावित राजुरा बृहत लपा धरणात पाणी आणण्यात येणार आहे. तसेच त्यातून उजव्या कालव्याव्दारे (PDN) सिंचन करण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पाची साठवण क्षमता 5.989 दलघमी इतकी आहे.

             या योजनेस विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने 2008-09 मध्ये 44 कोटी 79 लाख रुपयांच्या तरतुदीस मुळ प्रशासकीय मान्यता दिली होती. या प्रकल्पाचे सन 2017-18 च्या दरसूचीवर आधारीत रु.193.81 कोटी इतक्या किंमतीस प्रथम सुधारीत प्रशासकीय मान्यतेची शिफारस राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समिती, नाशिकने केली होती. त्याला विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाने मान्यता दिली आहे. त्यानुसार खास बाब म्हणून या प्रकल्पाच्या खर्चाच्या तरतुदीस सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला, असेही श्री. कडू यांनी सांगितले.
Previous Post Next Post
MahaClickNews