गत तीन वर्षांत मेळघाटातील मातामृत्यू व बालमृत्यूत घट - मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा

पोषण आहार व विविध योजनांच्या अंमलबजावणीने कुपोषणात घट

गत तीन वर्षांत मेळघाटातील मातामृत्यू व बालमृत्यूत घट

-मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा


अमरावती, दि. 13 :  _*कुपोषण निर्मूलनासाठी आरोग्य विभागातर्फे राबविण्यात येणा-या पोषण आहार व विविध योजनांमुळे मेळघाटात गत तीन वर्षांत कुपोषणाचे प्रमाण कमी झाले. मेळघाट भागात बालमृत्यू दर गत 3 वर्षांच्या तुलनेत कमी झाला आहे. 2019-20 मध्ये बालमृत्यूदर 5.94 वरून 2021-22 मध्ये 3.62 इतका झाला आहे. उपजत मृत्यूदरही कमी झाला असून, 2019 मध्ये 3.65 वरून 2021 मध्ये 1.03 पर्यंत घटला आहे, अशी माहिती जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिली*._

            मेळघाट भागात 49 बालमृत्यू झाल्याबाबतच्या काही बातम्या प्रसिद्ध झाल्या. तथापि, ही बाब वस्तुस्थितीवर आधारित नाही, असे मुख्य कार्यकारी अधिका-यांनी स्पष्ट केले आहे. 49 बालमृत्यूचे विश्लेषण पाहता 8 इतर आजार, 6 जंतुसंसर्ग, 4 कीटकदंश, 3 जन्मत: व्यंग, 3 न्यूमोनिया, दोन अपघाती मृत्यू अशी कारणे आढळली. इतर आजारांनी झालेल्या मृत्यूचे प्रमाण 80 टक्क्यांपर्यंत आहे.  बालमृत्यू, कुपोषण टाळण्यासाठी  अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांच्या समन्वयाने योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत आहे, असे श्री. पंडा यांनी सांगितले. 

                                    *सातत्यपूर्ण मोहिमा*

आरोग्य विभाग व एकात्मिक बालविकास विभागातर्फे जूनमध्ये 40 पथकांमार्फत 325 गावांत 10 दिवसांच्या कालावधीत झोन सर्वेक्षण करून बालकांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत तीव्र कुपोषित बालकांना बाल उपचार केंद्र, पोषण पुनर्वसन केंद्रात भरती करून औषधोपचार करण्यात येतो. तपासणी मोहिमा सातत्याने होतात. त्यानुसार 15 ते 31 ऑगस्टदरम्यान तपासणीची मोहिम राबविण्यात येत आहे, असेही श्री. पंडा यांनी सांगितले.

    *मातामृत्यूच्या प्रमाणातही घट*

मेळघाटात कुपोषणाचे प्रमाण कमी व्हावे व बालमृत्यू रोखण्यासाठी पोषण आहार योजना, गरोदर, स्तनदा मातांना चौरस आहार, जननी सुरक्षा योजना, बालकांना न्यूट्रिशियस फूड, बालकांची नियमित तपासणी व उपचार आदी विविध प्रयत्न वैद्यकीय अधिकारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका यांच्या समन्वयातून होत आहेत, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांनी सांगितले.

कुपोषण निर्मूलन कार्यक्रमात सीटीसी, एनआरसी, एसएनयुव्ही, व्हीसीडीसीमार्फत सॅम व मॅममध्ये असणा-या बालकांना औषधोपचार व आहारसंहितेनुसार आहार दिला जातो. हिमोग्लोबिन कमी असणा-या मातांना आयर्न सुक्रोजचे डोस आयव्ही देऊन हिमोग्लोबिन वाढीसाठी प्रयत्न होतात. याचीच फलश्रुती म्हणून गत दोन वर्षात मातामृत्यू व बालमृत्यू घटले आहेत.  

2019-20 या वर्षात 65 बालमृत्यू होते. ते  49 पर्यंत घटले आहे. गत तीन वर्षांची अनुक्रमे बालमृत्यूदराची आकडेवारी 5.94, 3.93, 3.62 अशी घटती आहे. मातामृत्यूचे प्रमाणही घटले आहे. चालू वर्षात केवळ एका मातामृत्यूची नोंद आहे.  

                                    *विनाखंड आरोग्यसेवा*

कोविडकाळ असतानाही मेळघाटातील धारणी व चिखलदरा दोन्ही तालुक्यांत पोषण आहार व इतर योजनांच्या अंमलबजावणीत खंड पडू दिला नाही. मनरेगाची कामे मोठ्या प्रमाणावर राबवून स्थलांतर रोखण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. त्यामुळे स्थलांतर रोखले जाऊन गरजूंना पोषण आहार व इतर योजनांचा लाभ विनाखंड मिळाला. त्यामुळे कुपोषणाचे व बालमृत्यूचे प्रमाणही घटले.  रूग्णालय स्तरावर उपचारसुविधांची सज्जता, पोषण आहार, लोकशिक्षण, गावोगाव आशा सेविका व अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून प्रभावी संपर्कयंत्रणा यामुळे कुपोषणाचे प्रमाण कमी होत आहे.  कुपोषण निर्मूलनासाठी एकात्मिक बालविकास योजनेत न्यूट्रिशियस फूडची पाकिटे बालकांना देण्यात येत आहेत. अमृत आहार योजनेत मेळघाटातील धारणी व चिखलदरा येथील गरोदर व स्तनदा माता यांना चौरस आहार व 6 वर्षांपर्यंतच्या बालकांना अंगणवाडी केंद्रामार्फत अंडी पुरविण्यात येत आहेत. बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी व आनंददायी शिक्षणासाठी ‘बाला पॅटर्न’ राबविण्यात येत आहे, असेही डॉ. रणमले यांनी सांगितले.
Previous Post Next Post
MahaClickNews