नांदगावपेठ ग्रामपंचायतीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण _नांदगावपेठेतील इतर कामांसाठीही निधी मिळवून देऊ - पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

अमरावती, दि. १६ : नांदगावपेठ येथील शादल बाबा दर्गा व संगमेश्वर संस्थान विकास, तसेच आवश्यक कामे व रस्त्यासाठी पुरेसा निधी मिळवून देऊ, अशी ग्वाही राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज नांदगावपेठ येथे दिली.

नांदगावपेठ ग्रामपंचायतीच्या इमारतीचे लोकार्पण पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. जि. प. अध्यक्ष बबलूभाऊ देशमुख, पं स सदस्य बाळासाहेब देशमुख, सरपंच कविताताई डांगे, उपसरपंच मझहर खान सफदर खान, माजी जि. प. सभापती जयंतराव देशमुख, गोपाळराव धर्माळे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, नांदगावपेठ येथे  वाचनालय व इतर सर्व विकासकामे निश्चितपणे पूर्ण करू. विकासकामांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही.

*राष्ट्रसंताच्या हस्ते झाले होते मूळ इमारतीचे लोकार्पण*

नांदगावपेठेच्या मूळ ग्रामपंचायत भवनाचे लोकार्पण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या हस्ते १९६१ मध्ये झाले. त्याबाबत गौरवपूर्ण उल्लेख करताना पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, राष्ट्रसंतांनी  आपल्या विचार व कार्यातून देशाला ग्रामविकासाची दिशा दिली. त्यांनी लोकार्पण केलेली इमारत आज नव्या रुपात उभी राहिली याचा आनंद आहे. राष्ट्रसंतांच्या कार्याची प्रेरणा घेऊन शासनाकडून ग्रामविकासासाठी अनेक प्रकल्प व कामे हाती घेण्यात आले आहेत. राष्ट्रसंतांचे विचार व कार्य जपण्यासाठी व पुढे नेण्यासाठी आपण शेवटच्या श्वासापर्यंत काम करू. नांदगावपेठेचे महानगरालगत सान्निध्य व नागरीकरण पाहता येथे नगरपंचायत स्थापन होण्याबाबत विचार होणे आवश्यक आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाला विविध मान्यवर व नागरिक उपस्थित होते.
Previous Post Next Post
MahaClickNews