डेंग्यू चाचणीसाठी स्वतंत्र प्रयोगशाळेच्या दृष्टीने हालचालींना वेग - पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

अमरावती, दि. 26 : _अमरावती येथे डेंग्यू चाचणी प्रयोगशाळा सुरू होण्याच्या दृष्टीने हालचालींना वेग आला असून, त्यामुळे लवकर अहवाल मिळून रुग्णांना तातडीने उपचार मिळवून देणे शक्य होणार आहे, असे महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी सांगितले._

 

 डेंग्यू या आजाराचे निदान तत्काळ होऊन उपचार मिळणे आवश्यक असते.  वेळेत निदान  न झाल्यास अनेकदा रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होतो. विभागाचे मुख्यालय असूनही अमरावती जिल्ह्यात डेंग्यू चाचणीची प्रयोगशाळा नाही. अकोल्यातील प्रयोगशाळेतून अहवाल येण्यास अनेक दिवस लागतात. अशा काळात निदान न होणे, प्लेटलेटस् कमी होणे व जोखीम वाढणे असे प्रकार घडू शकतात. हे लक्षात घेऊन पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी तातडीने या मागणीचा शासन स्तरावर पाठपुरावा सुरू केला असून, लवकरच अशी स्वतंत्र प्रयोगशाळा सुरू करण्याचे नियोजन आहे.   

      डेंग्यू चाचणीसाठी अमरावती स्तरावर स्वतंत्र प्रयोगशाळेची गरज लक्षात घेऊन याबाबतचा प्रस्ताव आरोग्य सेवा सहसंचालक यांच्या माध्यमातून हा प्रस्ताव आयसीएमआरला पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर पुणे येथील आरोग्य सहसंचालक कार्यालयातर्फे डेंग्यू तपासणी प्रयोगशाळेकरिता रीडर, वॉशर, कॉम्प्युटर आणि इतर आवश्यक साधने उपलब्ध होणार आहेत. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये या प्रयोगशाळेच्या निर्मीतीचे नियोजन आहे. ही लॅब लवकरात लवकर सुरू करण्यासाठी पालकमंत्र्यांकडून सातत्याने पाठपुरावा होत आहे.

 

            कोरोनाकाळातही स्थानिक स्तरावर चाचणी अहवाल मिळावेत यासाठी गतीने प्रयोगशाळा कार्यान्वित करण्यात आली होती. डेंग्यू चाचणीसाठी लॅब सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उभारण्याचे नियोजन आहे. त्यामुळे चाचणी अहवाल वेळेत प्राप्त होऊन रुग्णांना उपचार मिळणे शक्य होणार आहे.  

                         

*सुपर स्पेशालिटीच्या नवीन इमारतीत स्वतंत्र कक्ष*

 

डेंग्यू चाचणीच्या प्रयोगशाळेसाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाच्या पथकाने गुरुवारी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या दोन्ही इमारतींच्या मध्यभागी बांधलेल्या दोन विशेष खोल्यांची लॅब बांधणीसाठी तपासणी केली. या

प्रयोगशाळेचा व साधनसामग्रीचा प्रस्ताव आरोग्य सेवा विभाग, पुणे यांच्या सह-संचालकांकडे पाठवण्यात आला आहे, असे हिवताप नियंत्रण कार्यालयातर्फे सांगण्यात आले.
Previous Post Next Post
MahaClickNews