अंगणवाडी सेविकांप्रमाणे आशा वर्करांना नियमित मानधनासाठी प्रयत्न करु  - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

अंगणवाडी सेविकांना सीडीपीओ पदावर पदोन्नतीसाठी धोरण आखणार

अंगणवाडी सेविकांप्रमाणे आशा वर्करांना नियमित मानधनासाठी प्रयत्न करु
  - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

यावली शहिद येथे कोरोना योध्दांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कारअमरावती, दि. 14 : कोरोना संकटकाळात अंगणवाडी सेविकांनी जीवाची पर्वा न करता घरोघरी जाऊन कोरोनाबाधितांचे सर्वेक्षण करुन महत्वपूर्ण माहिती गोळा करण्याचे काम केले आहे. कोविड काळात राबल्यामुळेच कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेला थोपविण्यात शासनाला यश मिळाले. अंगणवाडी सेविकांनी जबाबदारीपूर्वक काम केल्याने जिल्ह्यात अचूक माहितीन्वये शासनाला वेळोवेळी उपाययोजनांचे नियोजन करुन प्रयत्न करता आले, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले.

     यावली शहिद येथे कोरोना काळात उत्कृष्ठ काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका, आशावर्कर व महिला पोलीस, आरोग्य कर्मचारी आदींचा पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला, त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास सभापती पुजाताई आमले, जि.प. सदस्य अलकाताई देशमुख, भारतीताई गेडाम, विरेंद्र लंगडे, गजानन राठोड, तिवसा पंचायत समिती सभापती संगीता तायडे, सदस्या शिल्पा महल्ले, ज्योती ठाकरे, पदाधिकारी उषाताई देशमुख, यावली शहिद सरपंच पुजाताई यावलीकर यांच्यासह परिक्षेत्रातील अंगणवाडी सेविका, आशावर्कर, आरोग्य कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते.

            श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, कोरोना संकटकाळात अंगणवाडी सेविका, आशा वर्कर तसेच आरोग्य कर्मचारी, पोलीस आदींनी जीवाची पर्वा न करता जबाबदारीपूर्वक काम केले आहे. स्वत:च्या कुटुंबाला बाजूला ठेवून समाजहितासाठी त्यांनी घरोघरी जाऊन सवेक्षण करुन कोरोना बाधितांची माहिती गोळा केली आहे. या माहितीच्या आधारे शासनाला कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासाठी खूप मोठी सहकार्य मिळाले.

        कोरोना संकटकाळात अंगणवाडी सेविकांनी, आशा वर्कर ताईंनी जनसामान्यांच्या शंकांचे निरसन करुन प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्यासाठी व्यापक जनजागृतीही केली आहे. कोरोना संकटात सर्वेक्षणाचे काम करतांना जिल्ह्यातील दोन अंगणवाडी सेविकांना आपले प्राणाला मुकावे लागले. त्यांना शासनाकडून 50 लाख रुपयाचे सानुग्रह निधी मिळवून दिला आहे. त्यांचा या कामाचे कुठेही तोड नाही. अंगणवाडी सेविकांचे मानधन वाढावे ही त्यांची मागणी रास्त आहे. तसेच आशावर्कर यांनाही नियमित मानधन मिळावे, यासाठी शासनस्तरावर नियमांमध्ये बदल करुन धोरण आखण्यात येणार आहे. आगामी काळात अंगणवाडीसेविकांना तसेच आशावर्कर यांना नियमित मानधन मिळावे, यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केल्या जाईल.

        अंगणवाडी सेविकांना त्यांनी केलेल्या कामांचा गौरव व्हावा, त्यांच्या मुलांनाही इतरांप्रमाणे उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध होता यावी, यासाठी बालविकास प्रकल्प अधिकारी पदापर्यंत पदोन्नतीसाठी प्रयत्न करण्यात येणार. ज्याप्रमाणे अंगणवाडी सेविका एका एका बालकाला आपले समजून पोषण आहार व निरीक्षणातून त्याचे भविष्य घडविते, त्यासाठी मी सर्व अंगणवाडी सेविकांचे मनापासून आभार मानते, असेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

        यावेळी आयोजित कृतज्ञता सोहळ्यात सुमारे 35 अंगणवाडी सेविका, मदतनिस, आशावर्कर व महिला पोलीस, आरोग्य अधिकारी, कर्मचारी आदींचा पालकमंत्र्यांच्या हस्ते भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन प्रातिनिधीक स्वरुपात सत्कार करण्यात आले
Previous Post Next Post
MahaClickNews