नागरिकांसाठी छत्री तलाव पर्यटन स्‍थळ लवकरच सुरु होणारसभागृह नेता तुषार भारतीय

अमरावती प्रतिनिधी,

दिनांक २५ ऑगस्‍ट,२०२१ रोजी सभागृह नेता तुषार भारतीय यांनी छत्री तलावाची पाहणी केली. सभागृह नेता तुषार भारतीय यांनी छत्री तलाव पर्यटन स्‍थळ नागरिकांसाठी लवकरच सुरु करण्‍याचे निर्देश या पाहणी दरम्‍यान दिले. सभागृह नेता तुषार भारतीय यांनी सदर कामाची संपुर्ण पाहणी केली व सदर काम गतीने पुर्ण करावे व अमरावतीकर नागरीकांना पर्यटन स्‍थळ उपलब्ध करुन द्यावे अश्‍या सुचना यावेळी देण्‍यात आल्‍या. शहर अभियंत्‍यांना यावेळी त्‍यांनी सुचना दिल्‍या की, बीओटीची प्रक्रिया सुरु करुन सदर विषय मंजुरी करीता सप्‍टेंबरच्‍या सर्वसाधारण सभेत ठेवण्‍यात यावा. या ठिकाणी ओपन थेटर व्‍यवस्‍था करण्‍यात आली असली तरी येथे लेजर शो सदर कामात प्रस्‍तावित करुन दररोज सुरु ठेवण्‍याची व्‍यवस्‍था करावी. कंत्राटदाराने सदर ठिकाणी त्‍वरीत सुरक्षा गार्ड ची नियुक्‍ती करावी. तलावाच्‍या बाजुने सुरक्षा कठडे लावावे. पाथवे ला सु‍शोभित करणारे लाईट लावून सदर काम त्‍वरीत पुर्ण करावे. हायमास्‍क लाईट लावण्‍यात आले असून ते कार्यान्वित करावे. छत्री तलावमध्‍ये बोटींग सुरु करण्‍यासाठी त्‍वरीत प्रक्रिया राबविण्‍याचे निर्देशही यावेळी त्‍यांनी दिले. सदर परिसर अतिशय नयनरम्‍य झाला असून अमरावतीकरांना हक्‍काचे पर्यटन स्‍थळ उपलब्‍ध होणार आहे. कंत्राटदाराने सदर काम हे गुणवत्‍ता पुर्वक व दर्जेदार करणे अपेक्षित आहे. कामात येणा-या अडचणी त्‍वरीत सोडवून सदर प्रकल्‍प पुर्णत्‍वास न्‍यावा असे तुषार भारतीय यांनी यावेळी म्‍हटले.

छत्री तलाव परिसर विकसित करणे असे प्रकल्‍पाचे नाव आहे. या प्रकल्‍पाचा सल्‍लागार फोर्थ डायमेन्‍शन आर्कीटेक्‍ट प्रा. लि. पुणे हे आहे. या प्रकल्‍पात पाथ-वे, घाट, स्‍वच्‍छता गृह, फुड फोर्ट, टिकीट घर, गझीबो, कंपाऊंड वॉल, प्रवेश द्वार, ओपन जिम, किड्स प्‍ले ऐरीया, हॉर्टीकल्‍चर इत्‍यादी कामाचा समावेश आहे. सदर कामाचा कंत्राटदार जे.पी.ई. अँड एन.आय.आर. मुंबई हे आहे. स्‍वच्‍छता गृह व फुड पोर्ट चे काम प्रगती पथावर आहे. पाथ-वे व घाटचे तलावा बाजुचे काम सुरु आहे. प्रवेशद्वार, सुरक्षा कक्ष व टिकीट कक्षाचे बांधकाम पुर्ण झालेले आहे. या परिसरात सुसज्‍ज पार्कींग व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे.

छत्री तलाव येथील गणपती विसर्जन स्‍थळाचीही पाहणी यावेळी करण्‍यात आली. सदर विसर्जन स्‍थळ नव्‍याने निर्माण करण्‍यात आले असून सदर ठिकाणी संपुर्ण व्‍यवस्‍था करण्‍याचे निर्देशही यावेळी देण्‍यात आले.     

यावेळी शहर सुधार समिती सभापती अजय गोंडाणे, नगरसेविका संध्‍या टिकले, नगरसेवक ऋषी खत्री, बलदेव बजाज, शहर अभियंता रविंद्र पवार, जनसंपर्क अधिकारी भुषण पुसतकर, उपअभियंता श्‍यामकांत टोपरे, प्रमोद इंगोले, अभियंता आनंद जोशी, कंत्राटदाराचे प्रतिनिधी उपस्थित होते.
Previous Post Next Post
MahaClickNews