मोझरी येथे पालखी मार्गाचे पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते भूमीपूजन

अमरावती, दि. १६ : मोझरी येथील पालखी मार्गाचे काम गुणवत्तापूर्ण व्हावे, तसेच ते विहित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले.

मोझरी येथील पालखी मार्ग बाजार ओटे ते दास टेकडी रस्त्यावर काँक्रीट व सुधारणा कामाचे भूमीपूजन पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते आज झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. अनेक मान्यवर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता अधिकारी व कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, या मार्गाची सुधारणा होत असल्याने एक चांगली सुविधा निर्माण होणार आहे. विहित वेळेत हे काम पूर्ण व्हावे. त्याचबरोबर, इतरही आवश्यक रस्त्यांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

या कामासाठी ४४.८० लक्ष निधीला प्रशासकीय व तांत्रिक मान्यता यापूर्वीच प्रदान करण्यात आली आहे. त्यानुसार मोझरी येथील बाजार ओटे व दास टेकडी मार्गावर काँक्रीट व वेरिंग कोर्स पूर्ण करण्यात येत आहे.
Previous Post Next Post
MahaClickNews