स्व.सोमेश्वर पुसतकर लोकगौरव पुरस्कार नानक रोटी ट्रस्टला प्रदान  स्व.पुसतकर यांचे कार्य सर्वांनी समन्वयाने पुढे न्यावे.  पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. 2 : स्व. सोमेश्वर पुसतकर यांनी राजकारणाबरोबरच समाजकारण व विविध क्षेत्रांत अतुलनीय कामगिरी केली. अमरावती शहर व जिल्ह्यात अनेकविध विधायक उपक्रम त्यांनी राबवले. त्यांचे कार्य कृतीतून पुढे नेण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले.  
         लोक फाऊंडेशनतर्फे स्व. सोमेश्वर पुसतकर यांच्या पहिल्या स्मृतिदिनी लोकगौरव पुरस्कार नानक रोटी ट्रस्टला विविध मान्यवरांच्या उपस्थितीत श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या सभागृहात समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या. माजी आमदार बी. टी. देशमुख अध्यक्षस्थानी होते. जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू, वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी, हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य, माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्यासह विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

         सामाजिक क्षेत्रात काम करणा-यांना प्रोत्साहनासाठी फाऊंडेशनतर्फे मानचिन्ह, मानपत्रासह 1 लाख रूपयांचा पुरस्कार यंदापासून देण्यात येत आहे. त्यानुसार पहिला पुरस्कार नानक रोटी ट्रस्टचे मनोज पारसवानी व इतर सदस्यांनी यावेळी स्वीकारला.

           स्व. पुसतकर हे जातपात, पक्ष, विचारधारा हा विचार न करता सार्वजनिक कामात झोकून देणारे सच्चे व तळमळीचे कार्यकर्ते होते. अशाच समन्वयातून त्यांचे कार्य आम्हा सर्वांना पुढे न्यायचे आहे, असे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

            राज्यमंत्री श्री. कडू म्हणाले की, स्व. पुसतकर हे अभ्यासू व व्यासंगी कार्यकर्ते व राजकारणापलीकडील व्यक्तिमत्व होते. कुठलेही पद न मिळवताही त्यांनी अनेक मोठी कामे यशस्वी केली. पुरस्कारप्राप्त नानकरोटी ट्रस्टने तळागाळातील गरजू व्यक्तींसाठी मोलाचे कार्य हाती घेतले आहे. गरीब व गरजू अन्न पुरविण्याची निकड लक्षात घेऊन आपणही गाडगेबाबा रोटी हा उपक्रम सुरू केला आहे.

       श्री. देशमुख म्हणाले की, स्व. पुसतकर यांचा व्यासंग दांडगा होता. ते अत्यंत गांभीर्याने प्रश्न जाणून घेत व त्याच्या निराकरणासाठी कष्टपूर्वक प्रयत्न करीत. अनुशेषाचा प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी अभ्यासपूर्वक पाठपुरावा केला. उत्तम ग्रंथांचे वाचन व सज्जनांचा सहवास ही जीवनवृक्षाची दोन मधुर फळे आहेत, या संस्कृत सुभाषिताप्रमाणे स्व. पुसतकर यांनी स्वत:चे व्यक्तित्व घडवले. या सच्च्या कार्यकर्त्याच्या नावाचा पुरस्कार नानक रोटी ट्रस्टला मिळाला. ही सार्थ निवड असल्याचेही श्री. देशमुख म्हणाले.    

         स्व. पुसतकर यांच्या कार्याची ओळख म्हणून श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या सभागृहाला यांचे नाव देण्यात येत असल्याची घोषणा श्री. वैद्य यांनी केली.  
यावेळी स्व. पुसतकर यांच्या व्यक्तित्व व कार्यावर प्रकाश टाकणारी डॉक्युमेंटरीही दाखविण्यात आली. पत्रकार अविनाश दुधे यांनी प्रास्ताविक केले. वैभव दलाल यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला प्रसिद्ध अभिनेते भारत गणेशपुरे यांच्यासह राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शिक्षण आदी विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

                       
Previous Post Next Post
MahaClickNews