आता पोलीस स्टेशनमध्ये महिला व मुलांसाठी समुपदेशन केंद्र महिला व बालविकास विभागाचा उपक्रम

अमरावती, दि. ४ : महिला व मुलांचे कौटुंबिक हिंसाचारापासून बचाव करण्यासाठी त्यांना सुरक्षा प्रदान करुन त्यांचे समुपदेशन करण्यासाठी जिल्ह्यात राजापेठ, अमरावती, अचलपुर, अंजनगांव सुर्जी व मोर्शी येथील पोलीस स्टेशनमध्ये महिला व मुलांचे सहाय्य कक्ष (समुपदेश केंद्र) स्थापित करण्यात आले आहे. महिला व बाल विकास विभागाच्या मान्यतेने समुपदेशन कक्ष संस्थेमार्फत चालविण्यात येणार आहे.

                  या समुपदेशन केंद्रामध्ये कौटूंबिक हिंसाचार व इतर प्राप्त प्रकरणामध्ये अर्जदार व गैरअर्जदार यांचे समुपदेशन करून त्यांना उपलब्ध असलेल्या कायद्याबाबत माहिती देण्यात येणार. समुपदेशन केंद्राव्दारे आपसी सोडचिठ्ठी, घटस्फोट, नोटरी आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. आपसी सोडचिठ्ठी करण्यासाठी नोटरी, सोडचिठठी संदर्भात सल्ला व मार्गदर्शनही या केंद्राच्या माध्यमातून संबंधितांना देण्यात येईल.

               या समुपदेशन केंद्रामध्ये अर्जदार व गैरअर्जदार यांना नोटीस पाठविण्यासाठी किंवा तक्रार नोंदणी करण्यासाठी कोणत्याही प्रकारची फी आकारणी केल्या जात नाही. समुपदेशक यांनी दिलेल्या कोणत्याही माहीती, कायद्याबाबत समज किंवा गैरसमज असल्यास तालुका विधी सेवा प्राधिकरण यांच्याकडून योग्य ती कायदेशीर माहीती जाणुन घेऊन योग्य सल्लाही दिला जाईल.

                या समुपदेशन केंद्राव्दारे व्यवस्थित सल्ला किंवा दाखल प्रकरणांबाबत कार्यवाही यासंदर्भात नागरिकांना काही तक्रार असल्यास जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, दत्तात्रय सदन दसरा मैदान रोड, भुतेश्वर चौक , देशपांडेवाडी, अमरावती येथे लेखी तक्रार करावी, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
Previous Post Next Post
MahaClickNews