नांदगाव खंडेश्वर, चांदुर रेल्वे भागाची केली पाहणी भरपाईचे प्रस्ताव तत्काळ सादर करा पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

अमरावती दि 11: अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाचे पंचनामे पूर्ण करून भरपाईचे प्रस्ताव तत्काळ सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज 
नांदगाव खंडेश्वर व चांदुर रेल्वे तालुक्यातील पाहणी दरम्यान दिले.

जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे निर्माण झालेल्या विविध भागातील पूरपरिस्थितीची पाहणी श्रीमती ठाकूर यांनी केली.
माजी आमदार वीरेंद्र जगताप,  उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी, नांदगाव खंडेश्वरचे  तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी, कार्यकारी अभियंता विभावरी वैद्य, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल खर्चान आदी उपस्थित होते.


नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील दाभा गावातील पाझर तलावाचे पाणी परिसरातील 32 घरांमध्ये शिरले. त्याचप्रमाणे धवळसरीच्या 5 आणि टीमटाळा येथील 3 घरांचे पावसामुळे नुकसान झाले. नुकसनाग्रस्तांना सानुग्रह अनुदानाची रक्कम तात्काळ प्रदान करण्यात यावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

 
बेबळा नदीला आलेल्या पुरामुळे नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सुमारे 5 हजार 595 हेक्टर क्षेत्रात शेतामध्ये पाणी शिरले, असा प्राथमिक अहवाल आहे. पंचनामे करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून त्याबाबतचे प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आले असल्याची माहिती पुरुषोत्तम भुसारी यांनी माहिती दिली. 

शिवणी रसुलापूर मार्गावरील बेंबळा व साखळी नदीच्या पुलावरून पाणी गेल्यामुळे परिसरातील शेतीचे नुकसान झाले. 92 हेक्टर शेतजमीन खरडून निघाली आहे. याबाबतचे तत्काळ  पंचनामे करून तसा अहवाल सादर करण्याबाबतचे निर्देश श्रीमती ठाकूर यांनी दिले.
बेंबळा नदीच्या पुरामुळे शेलू नटवा येथील 40 हेक्टर वरील बाधित झालेल्या शेतीचे पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश श्रीमती ठाकूर यांनी संबंधितांना दिले.

चांदुर रेल्वे तालुक्यातील खोलाड  नदीची पावसामुळे  पाण्याची पातळी वाढल्यामुळे तालुक्यातील 180 घरांची अंशतः पडझड झाली असून 4 घरे पूर्णपणे पडली आहे. याबाबत पंचनामा करण्याची प्रक्रिया तत्परतेने व गतीने करण्यात यावी असे निर्देश श्रीमती ठाकूर यांनी संबंधितांना दिले. चांदुर रेल्वे तालुक्यातील16 गावातील अंदाजे 350 हेक्टर वरील पिकाचे नुकसान झाले असून 20 हेक्टर जमीन खरडलली आहे.अशी माहिती तहसीलदार राजेंद्र इंगळे यांनी दिली.पंचायत समिती सभापती सरिता देशमुख, पालसखेड सरपंच आरती पारधी, उपसरपंच अमोल अडसड आदी उपस्थित होते. 

कवठा कडू येथील पुलाची उंची वाढविणे, भिलटेक येथे नालाड नाल्यापाशी संरक्षण भिंत उभारण्यात यावी असे निर्देश श्रीमती ठाकूर यांनी दिले.
पळसखेड, कवठा कडू, दिघी या गावातील काही भागांची पाहणी करताना पूरपरिस्थितीत संरक्षक असणाऱ्या सर्व उपाययोजना करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले
Previous Post Next Post
MahaClickNews