साकीनाका घटना अत्यंत वेदनादायी गुन्हेगारांना कठोर शिक्षा होणार महिला व बालविकास मंत्री - ॲड. यशोमती ठाकूर

साकीनाका घटना अत्यंत वेदनादायी

गुन्हेगारांना कठोर शिक्षा होणार

महिला व बालविकास मंत्री - ॲड. यशोमती ठाकूरमुंबई दि ११ -  साकीनाका येथील बलात्कार पिडीत महिलेचा उपचारादरम्यान झालेला मृत्यू अत्यंत वेदनादायी असून महाराष्ट्रात अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्यांना कडक शिक्षा केली जाईल, कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही अशी प्रतिक्रीया राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ॲड यशोमती ठाकूर यांनी दिली आहे. 

कोविड काळात राज्यातील काही भागांमध्ये महिला अत्याचाराच्या घटना घडल्याच्या बातम्या येत आहेत. शासन अशा सर्वच घटनांकडे संवेदनशीलतेने पाहत आहे. महिला अत्याचाराच्या घटना घडल्यानंतर महिला आयोगाचे अधिकारी तात्काळ स्थानिक पोलीसांच्या मदतीने मदत-समुपदेशन तसंच SOP प्रमाणे मदत करत असतात. अशा घटनांमध्ये समुपदेशन तसंच मानसिक आधाराची गरज असल्याने सर्वच बाबी प्रसारमाध्यमांसमोर उघड करता येत नाहीत, मात्र स्थानिक स्तरावरही आरोपीला कुठल्याच प्रकारची मदत होणार नाही, आणि कडक शिक्षा व्हावी यासाठी शासन प्रयत्नशील आहे. 

अशा घटनांमध्ये पिडीतेचा मृत्यू झाल्यास मनोधैर्य योजने अंतर्गत मृत्यू झालेल्या पीडितेच्या वारसाला दहा लाख रुपयांपर्यंतची मदत देण्याची तरतूद आहे. पीडिता गंभीर जखमी असल्यास १० लाख पर्यंत आर्थिक मदत व सर्व उपचारांचा खर्च शासनाकडून करण्याची तरतूद नियमात आहे. या दृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचना विभागाला देण्यात आल्या असल्याचे ॲड ठाकूर यांनी सांगितले. 


राज्याचे मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीपराव वळसे-पाटील, महिला व बालविकास मंत्री ॲड यशोमती ठाकूर हे जातीने अशा घटनांच्या तपासावर लक्ष ठेवून आहेत. पोलीस तपासाचा संपूर्ण आढावा महिला आयोग वारंवार घेतला जातो. अशा गुन्ह्यांचा तपास ही संवेदनशीलतेने व्हावा यासाठी महिला आयोगातील सर्वच अधिकारी सातत्याने तपास अधिकाऱ्यांशी संपर्क ठेवून असतात. येत्या काळात रखडलेला शक्ती कायदाही सभागृहात मंजूर होईल आणि राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये आढळून आलेल्या आरोपींना कडक शिक्षा होईल अशी आशा आहे अशी प्रतिक्रिया ही ॲड यशोमती ठाकूर यांनी दिली आहे.
Previous Post Next Post
MahaClickNews