जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम लिखीत 'लढा अदृश्य विषाणूशी' पुस्तकाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

अमरावती दि:5 - गेले दीड पावणेदोन वर्षे आपण कोरोना विषाणूशी लढा देत आहोत. जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेत कार्यरत प्रत्येक घटकांच्या समन्वयामुळे कोरोनाला मात देणे शक्य झाले. यादरम्यान उद्भवलेल्या परिस्थितीत डॉ.निकम यांनी केलेले नियोजन आणि संयमाने प्रत्येक समस्येचे केलेले निराकरण प्रशंसनिय आहे. कोरोना काळात प्रत्येक दिवसातील अनुभवाच्या विस्तृत नोंदी श्री.निकम यांनी पुस्तकरूपाने आज आपल्यासमोर आणल्या. अनुभवाचे हे संकलन आरोग्य क्षेत्रात कार्यरत सर्वांना मार्गदर्शक ठरेल असा विश्वास श्रीमती ठाकूर यांनी व्यक्त केला. जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. श्यामसुंदर निकम लिखीत 'लढा अदृश्य विषाणूशी' या पुस्तकाचे महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांच्या हस्ते आज प्रकाशन करण्यात आले.

      जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात पुस्तक प्रकाशन समारंभ आज आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्री वसंत आबाजी डहाके उपस्थित होते. जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय साखरे, श्रीमती प्रभाताई गणोरकर, विष्णू सोळंके, जोत्स्ना निकम आदी उपस्थित होते.

       श्रीमती ठाकूर म्हणाल्या, पुस्तकाचे शिर्षक वाचताक्षणी कोरोनाला दिलेला लढा डोळयासमोर उभा रहातो. रुग्णालयात भरती होणारे रुग्ण, आजारातून बाहेर पडताना रुग्णांना येणाऱ्या समस्या, त्यांची बदलणारी मानसिकता आणि प्रसंगी विषण्ण्‍ परिस्थिती आपण अनुभवली. डॉ.निकम यांनी कोरोना काळात  आरोग्य यंत्रणेत प्रत्यक्ष काम करताना आलेले अनुभव, समस्या, उपाययोजना, विषाणूशी लढा देत असतांना केलेल्या वाटचालीचे संकलन केले, ही मोलाची बाब आहे. या अनुभवातून तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याचे श्रीमती ठाकूर यांनी सांगितले.

      श्री डहाके यांनी म्हणाले, कोरोना विरोधातील लढयात डॉक्टरांची भूमिका महत्त्वाची आहे. रुग्णांवर उपचार करतेवेळी प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. कोरोना काळात आपण वेगवेगळया समस्यांचा सामना केला, आव्हाने स्विकारली. या सर्व बाबींचा या पुस्तकात समावेश आहे. पुढच्या पिढीला आपण या संकटाशी कसा मुकाबला केला याची विस्तृत माहिती मिळेल.

     उत्कृष्ठ आरोग्यसेवा देणारे डॉ. रवीभूषण आणि परिचारीका वर्षा पागोटे यांचा श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रारंभी डॉ निकम यांनी आपल्या प्रास्ताविकात ‘लढा अदृश्य विषाणूशी’ या पुस्तक निर्मितिमागचा  हेतू सांगितला. कार्यक्रमाचे संचालन दिपाली बाभुळकर यांनी केले. आभार अजय साखरे यांनी मानले.
Previous Post Next Post
MahaClickNews