२७ कोटी रुपये निधीतून होणार रस्ते, पुलांची कामे; जिल्ह्यात उत्कृष्ट रस्त्यांचे जाळे निर्माण करणार पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

अमरावती, दि. १९ : जिल्ह्यात रस्ते, पूल, इमारती आदी पायाभूत सुविधांच्या शेकडो कामांना चालना मिळाली आहे. याद्वारे उत्तम दर्जाच्या रस्त्यांचे जाळे व भक्कम पायाभूत सुविधा निर्माण होणार असून विकासाला गती मिळणार आहे, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले.

जिल्ह्यातील ग्रामीण भागात सुमारे २७ कोटी रुपये निधीतून रस्ते, पुलांच्या कामांचे भूमीपूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. 
_या कार्यक्रमात ४ कोटी रुपये निधीतून नांदगावपेठ येथे रिध्दपूर-बेलोरा-देवरी-कठोरा-नांदगाव पेठ रस्त्याच्या सुधारणा कामाचे, तर कठोरा गांधी येथे ६५ लक्ष निधीतून  रिध्दपूर-बेलोरा-देवरी रस्त्यावरील  पुलाच्या बांधकामाचे, पुसदा येथे ८ कोटी १० लक्ष निधीतून टाकरखेडा-दर्याबाद-पुसदा-सालोरा-माहुली जहाँगीर रस्त्याच्या सुधारणेचे, देवरा येथे साडेपाच कोटी निधीतून पेढी नदीवरील पुलाचे बांधकामाचे, तसेच साडेतीन कोटी रुपये निधीतून अडगाव-यावली-माहुली-पिंपळवीहीर रस्ता सुधारणेचे, कापूसतळणी येथे ४ कोटी निधीतून शिराळा-डवरगाव-मोझरी रस्त्यावरील 6 लहान पूलांच्या बांधकामाचे भूमीपुजन करण्यात आले._
*खेडीपाडी, गावांना जोडणारा प्रत्येक रस्ता पक्का करणार*
ग्रामीण रस्ते नादुरुस्त असल्याच्या तक्रारी अनेकदा होतात. हे लक्षात  घेऊन खेडीपाडी, गावांना जोडणारा प्रत्येक रस्ता पक्का करण्याचा शासनाचा निर्धार आहे.  त्यानुसार अनेक कामांसाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे.
यापुढेही नवे रस्ते बांधणीसह आवश्यक रस्तेदुरुस्तीबाबत प्रस्ताव द्यावेत. विकासकामांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली.


यावेळी विविध गावांतील नागरिकांशी संवाद साधून पालकमंत्र्यांनी त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व त्याचे निराकरण करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. महसूल, कृषी, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसह विविध गावांतील पदाधिकारी, गावकरी, युवक, महिलाभगिनी व विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.
Previous Post Next Post
MahaClickNews