सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी यांना महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या कडून सलाम

अमरावती, दि. 1 : पोलीस ताफ्यात सेवा देणा-या पोलीस कर्मचा-याला निरोप देताना महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांना गहिवरून आले. पोलीस दलात दीर्घकाळ प्रामाणिकपणे सेवा बजावणा-या सहायक पोलीस उपनिरीक्षक दामोदर डोंगरे यांना सेवानिवृत्तीनंतर निरोप देताना मंत्री श्रीमती ठाकूर यांनी कडक सलाम ठोकला.

          
       पोलीस दलातील सहायक पोलीस उपनिरीक्षक दामोदर गोविंद डोंगरे हे गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या ताफ्यात कार्यरत होते. जिल्हाभरातील विविध दौरे, विविध जबाबदा-या आदी कामकाजात श्री. डोंगरे यांनी प्रामाणिकपणे सेवा बजावली. पालकमंत्री टीमसोबत कार्यरत असताना ते या कुटुंबाचाच एक भाग झाले होते.

पोलीस दलात 34 वर्षांची सेवा बजावल्यानंतर ते आता निवृत्त झाले आहेत. त्यांच्या सेवानिवृत्तीनंतरच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देताना पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी त्यांना ओवाळले व सलाम ठोकला. यावेळी श्री. डोंगरे यांना गहिवरून आल्याने पालकमंत्रीही काहीशा गहिवरल्या.


श्री. डोंगरे यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देत पालकमंत्र्यांनी त्यांचा शाल-श्रीफळ देऊन गौरव केला.
Previous Post Next Post
MahaClickNews