अमरावती दि. २३ नोव्हेंबर - तिरुपतीच्या दर्शनाला गेलेले अमरावतीत राहणारे शेगोकार कुटुंबीय तिथे होणार्या मुसळधार पावासामुळे अडचणीत आले. परराज्यात अडकलेल्या ११ जणांच्या या कुटुंबांसाठी पालकमंत्री अॅड यशोमती ठाकूर धावून आल्या. आंध्रप्रदेशात काँग्रेस कार्यकर्त्यांमार्फत कुटुबांची तात्पुरती व्यवस्था करतच त्यांना विमानाने अमरावतीत ही सुखरुप घेउन आल्या. तिरुपतीचा आशिर्वाद होता आणि यशोमतीताई देवदूतासारख्या धावून आल्या म्हणून आज सुखरुप आहोत अशी भावना प्रवीण शेगोकारांनी व्यक्त केली आहे.
अमरावतीतील पत्रकार प्रविण शेगोकार आणि त्यांचे सह ११ जणांचे कुटुंब आंध्र प्रदेशात तिरुपती येथे देवदर्शनाला गेले होते. तिरुपती बालाजीचे दर्शन झाले मात्र परतीच्या वेळी मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा त्यांना फटका बसला. तेथील जनजीवन विस्कळित झाल्याने भोजन, निवासाची सोय उपलब्ध होत नव्हती. बस, ट्रेन सेवा ही बंद असल्याने हे कुटुंब गुडूर मधे अडकले. काही स्थानिक मंडळींनी लहान मुलांसह असलेल्या या कुटुंबाच्या गैरसोयीचा फायदा घेत खाण्याचे जिन्नस, रिक्षा प्रवास आदीत अव्वाच्या सव्वा भाव लावत लूटच केली. प्रवीण शेगोकारांनी स्थानिक प्रशासन, कंट्रोल रुम, जिल्हाधिकारी यांचे मदत मागितली मात्र कुणीच वेळेत सहकार्य न केल्याने कुटुंब हवालदिल झाले. गुडूर रेल्वे स्थानकात सेवा बंद असल्याने परतीच्या सुरक्षित प्रवासाचा ही प्रश्न होता.
अशात पालकमंत्री अॅड यशोमती ठाकूर यांना संपर्क साधला, त्यांना परिस्थितीची, सोबत असणार्या लहान मुल - जेष्ठ नागरिकांची कल्पना दिली. पालकमंत्र्यांनी फोनवर धीर देत सुखरुप अमरावतीमधे परत आणेन असा शब्द दिला. यशोमतीताईंनी तातडीने अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे सचिव बी एम संदीप यांना फोन केला. त्यांनी आंध्र प्रदेश कॉंग्रेसचे पदाधिकारी सी एम मयप्पन यांच्या मदतीने स्थानिक कॉंग्रेस कार्यकर्ता किरण कुमार यांना प्रत्यक्ष शेगोकार कुटुंबांच्या मदतीसाठी पाठवले. कुटुंबाला भोजन, निवास अशी सर्व मदत देण्याची व्यवस्था किरण कुमार यांनी केली. परराज्यात विश्वासू मदत, धीर मिळाल्याने कुटुंब ही आश्वस्त झाले. दरम्यान गुडूर ते चेन्नई अशा सुरक्षित प्रवासाची व्यवस्था केली. चेन्नई ते नागपूर अशी विमान प्रवासाची ११ जणांची सर्व व्यवस्था ही पालकमंत्री यशोमतीताईंनी केली.
“परराज्यात काय कराव कळत नव्हतं, नैसर्गिक आपत्तीचा सामना करताना ११ जणांच्या सुरक्षिततेची ही चिंता होती. अशा सगळ्या संकटात असताना पालकमंत्रीॲड. यशोमतीताई ठाकूर यांना फोन केला, आणि त्यांनी सर्व यंत्रणा तातडीने कामी लावत अमरावतीमधे सुखरुप परत आणलं अस सांगताना प्रवीण शेगोकार आणि त्यांचे कुटुंब भावनिक झाले होते. तिरुपतीच दर्शन झालं, आशिर्वाद मिळाला पण संकटात यशोमतीताई देवदूतासारख्या धावून आल्या अशा शब्दांत प्रवीण शेगोकारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.