गरजूंना सहायता योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती, दि. 27 : वंचित घटक, गरीब, आपद्ग्रस्त आदींसाठी शासनाकडून अनेकविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. शासनाच्या या विविध योजनांचा लाभ गरजूंना वेळेत मिळवून देण्यासाठी महाविकास आघाडी शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले. 

राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेत पात्र लाभार्थ्यांना प्रत्येकी 20 हजार रुपये मदत, तसेच शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील व्यक्तींना मदतीचे वाटप पालकमंत्र्यांच्या हस्ते शासकीय विश्रामगृह येथे झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. तहसीलदार संतोष काकडे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

            पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, वंचित घटक, गरीब, आपद्ग्रस्त आदींना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ वेळेत मिळाला पाहिजे. त्यामुळे प्रशासनाने सहायता योजनांसाठी प्राप्त अर्ज वेळेत निकाली काढून गरजूंना न्याय मिळवून दिला पाहिजे. एकही अर्ज प्रलंबित राहता कामा नये, असे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.  पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्यामुळे सहाय्य योजनेचा निधी तत्काळ प्राप्त झाला, असे तहसीलदार श्री. काकडे यांनी यावेळी सांगितले.

राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेत नया अकोला येथील सविता मकेश्वर, पुसदा येथील छाया वानखडे,नांदगावपेठ येथील सुमित्रा भोपडे, यावली शहीद येथील रजिया बानो सौदागर, नांदगावपेठ येथील रूपा यादव, अर्चना गजभिये, डिगर गव्हाण येथील पूनम ढोके, माहुली जहांगीर येथील सारिका खंडारे यांना मदतीचे वाटप झाले. शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना सहाय्य योजनेत शिराळा येथील अर्मळ कुटुंब, माहुली जहांगीर येथील काळकर कुटूंबाला मदतीचे वाटप यावेळी झाले.
Previous Post Next Post
MahaClickNews