अमरावतीमध्ये छोटा तुरेवाला सूरय पक्ष्याची दुर्मिळ नोंद

अमरावती शहरबाहेरील बोरगाव धरण परिसरात पक्षी निरीक्षण करतांना प्रशांत निकम पाटील  संकेत राजूरकर आणि कौशिक तट्टे या पक्षीनिरीक्षक व छायाचित्रकारांना 'छोटा तुरेवाला सूरय' या पक्ष्याची महत्वपुर्ण नोंद करण्यात नुकतेच यश आले आहे.
...... नोव्हेंबर महिना सुरू झाल्याबरोबर अमरावतीच्या आजूबाजूची जंगले आणि शहर परिसरातील जलाशये यांवर स्थलांतरित पक्ष्यांची संख्या उल्लेखनीयरित्या वाढते. याचमुळे हया काळात पक्षीनिरीक्षक आणि पक्षीछायाचित्रकार यांच्यात उत्साहाचे वातावरण असते. त्यातून दरवर्षी नवीन पक्ष्यांच्या नोंदीची भर पडते. शहारालगत असलेल्या बोरगाव धरण परिसरात नोव्हेंबर महिन्यात 'छोटा तुरेवाला सुरय' हा पक्षी पाहण्यात आला. या पक्ष्याला 'लेसर क्रेस्टेड टर्न' असे इंग्रजी नाव असून 'स्टेरना बंगालेंसिस' या शास्त्रीय नावाने ओळखले जाते. साधारणपणे याचा आकार ४३ ते ४४ से.मी असतो. चोचीचा रंग फिकट पिवळा-नारिंगी असून पाय काळे असतात. नदी सूरय पक्ष्याशी तुलना करता या पक्ष्याची चोच अधिक सरळ आणि अनुकुचीदार असते. विणीच्या हंगामात याच्या पूर्ण डोक्यापासून मानेपर्यंतचा भागावर गर्द टोपीवजा मुखवटा आणि डोक्यामागे पिसांचा लहानसा तुरा दिसून येतो. एरव्ही मस्तकाचा भाग पांढरा असतो. पाकिस्तान, बांग्लादेश व श्रीलंका येथे वसाहत करणारे हे पक्षी हिवाळी स्थलांतर करून भारतात मुख्यतः समुद्र किनारपट्टीवर याचे आगमन होते. मात्र साधारणपणे एप्रिल ते जून महिन्यात भारतीय उपखंडाच्या किनारपट्टीलगतच्या लहान लहान बेटांवर यांची वीण होते. या पक्ष्याची अंडी फिकट रंगाची असून त्यावर काळसर तपकिरी ठिपके असतात. हे पक्षी वाळू, खडक किंवा उथळ खळग्यात १-२ गोलाकार आकाराची अंडी घालतात. पाण्यातील मासे, झिंगे आणि इतर लहान प्राणी हे यांचे मुख्य खाद्य आहे. 
..... समुद्राच्या पाण्यावर भरारी घेणारा हा पक्षी सतत बदलणारे वातावरण आणि निसर्गाचा लहरीपणा किंवा मार्ग भटकल्यामुळे आश्चर्यकारकरित्या किनारपट्टीपासून इतक्या आत पठारी भागात आढळून आला असावा. ही संपूर्ण विदर्भातील पहिली नोंद ठरली आहे. अमरावती जिल्ह्यात आतापर्यंत चारशेहून अधिक पक्ष्यांची नोंद झाली आहे. येथील जंगल, जलाशयाची ही समृद्धता टिकवण्याची आणि वाढवण्याची प्रत्येक जागरूक, संवेदनशिल नागरिकाची जबाबदारी आहे असे प्रतिपादन प्रशांत निकम पाटील यांनी वृत्तपत्र प्रतिनिधीजवळ केले आहे.
Previous Post Next Post
MahaClickNews