यादीतून वगळलेल्या लाभार्थ्यांचा घरकुलासाठी विचार करा- पालकमंत्री ठाकूर

अमरावती, 8 डिसेंबर
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत राज्यातील गरीब आणि वंचित घटकांना घरकुल योजनेत समाविष्ट करण्यात येते. मात्र काही तांत्रिक कारणास्तव यादीतून वगळण्यात आलेल्या गरजूंना कशा पद्धतीने सामावून घेता येईल यासाठी प्रकल्प संचालकांनी आणि जिल्हा परिषदेने प्रयत्न करावा, अशा सूचना पालकमंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर यांनी दिल्या आहेत. जिल्ह्यातील घरकुलाबाबत झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी हे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. 
 प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जिल्ह्यात एकूण नोंदणी झालेल्या लाभार्थ्यांची संख्या एक लाख 74 हजार 143 इतकी आहे. यापैकी सुमारे 31 हजार 401 लाभार्थ्यांचे अर्ज विविध कारणांनी नाकारण्यात आले आहेत. त्यामुळे आता पात्र लाभार्थ्यांची संख्या 1 लाख 40 हजार 893 इतकी राहिली आहे. मात्र ज्या लाभार्थ्यांना यंत्रणे मधून काही कारणासाठी नाकारण्यात आले आहे हे लाभार्थी सुद्धा गरीब आणि गरजू आहेत त्यामुळे या लाभार्थ्यांचा यादीमध्ये कसा समावेश करता येईल याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक यांनी प्रयत्न करावा अशा सूचना पालकमंत्री ठाकूर यांनी यावेळी दिल्या.
अमरावती जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमधील राहून गेलेल्या लाभार्थ्यांची यादी तयार करण्याबाबत सर्व गटविकास अधिकारी यांना सूचना देण्यात आल्या आहेत. ग्रामपंचायत निहाय यादी तयार करण्याबाबतही सूचना देण्यात आल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिली दरम्यान ज्या दिवशी ऑनलाइन पोर्टल चालू होईल त्या दिवशी या लाभार्थ्यांचा समावेश करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
Previous Post Next Post
MahaClickNews