मुंबई दि 23 - अमरावतीच्या बेलोरा विमानतळासाठी आगामी अर्थसंकल्पात १४८ कोटींची तरतूद होणार आहे. विमाननतळ विस्तारीकरणासाठी १४८ कोटी सुधारीत खर्चाचा प्रस्ताव महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाकडून सामान्य प्रशासन विभागामार्फत नियोजन व वित्त विभागास सादर करण्यात आहे. आज या सुधारित खर्चास पालकमंत्री ॲड यशोमती ठाकूर, मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, विमानतळ प्राधिकरणाचे व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.
विमानतळ कामाला गती मिळण्यासाठी पुरेसा निधी अर्थसंकल्पित करण्यात यावा यासाठी पालकमंत्री ॲड यशोमती ठाकूर पाठपुरावा करत होत्या. विस्तारीकरणात 2600 चौ मी क्षेत्रफळाची नवीन टर्मिनल इमारत, नवीन २६ मीटर उंचीचा ए.टी.सी टाँवर व इतर बाबींसह 148 कोटी सुधारित खर्चाचा प्रस्ताव नियोजन व वित्त विभागास सादर करण्यात आला होता. आज मंत्रालयात पालकमंत्री ॲड यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सुधारित निधी अर्थसंकल्पित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.